Tuesday, May 8, 2012

'धडकबाज' जॉनचा तुरुंगवास टळला

* अन्य गुन्ह्याची नोंद नसल्याने सवलत 

* जखमींना प्रत्येकी १० हजारांच्या भरपाईचे आदेश 

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई 

सायकलस्वाराला धडक दिल्याच्या गुन्ह्यातून चित्रपट अभिनेता जॉन अब्राहमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. खालच्या कोर्टाने जॉनला दिलेली १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा योग्य असल्याचे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले. मात्र जॉनची पार्श्वभूमी आणि त्याच्यावर अन्य कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याने कोर्टाने प्रोबेशन ऑफ ऑफेंडर अॅक्टआधारे त्याला सवलत दिली. त्यामुळे जॉनचा तुरुंगवास टळला आहे. या अपघातातील दोघा जखमींना प्रत्येकी १० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. 

यामाहा हायाबुसा मोटारसायकलवरून सुसाट वेगाने जात असताना त्याच्या मोटारसायकलने सायकलला धडक दिली. एप्रिल २००६मध्ये वांद्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले होते. या प्रकरणी सेशन्स कोर्टाने जॉनला पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली. मात्र त्याच दिवशी त्याला तातडीने जामीन दिला. शिक्षेविरोधात जॉन अब्राहमने मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टाचे न्या. आर.सी. चव्हाण यांच्यापुढे हा खटला सुनावणीसाठी आला होता. जखमी झालेल्या शाम कसबेचे काही वर्षांनी आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे त्याच्या आईला या खटल्यात प्रतिवादी करण्याची मागणी सरकारी वकील राजश्री न्यूटन यांनी केली. कोर्टाने ही विनंती मान्य केली. 

या खटल्याची सोमवारी सुनावणी झाली. अपघातातील जखमी व त्याच्या नातेवाईकांनी जॉनबाबत कोणताही आक्षेप नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. पण न्या. चव्हाण यांनी अपघातातील जखमींना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले. खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा योग्य असल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले. असे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकाचे वाहनावर सदैव नियंत्रण असण्याची गरज व्यक्त केली. जॉनची पार्श्वभूमी व त्याच्या नावावर अन्य कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसणे, याचा विचार करता त्याला प्रोबेशन ऑफऑफेंडर अॅक्टमधील (वागणूक सुधारण्याच्या हमीवर) तरतुदीचा फायदा देता येईल, असे नमूद करीत कोटाने जॉनची दहा हजार रुपयांच्या बाँडवर त्याची सुटका केली.

No comments:

Post a Comment

Please feel free to contact or comment the article

Search This Blog